Thursday, September 11, 2014

अजूनही मी थबकते पाउसवेळांशी
त्याच त्या ओढीने
त्यांचा माझ्यावरचा हक्क सुखावतो
आजही तितकाच
थेंब होऊन त्यांच्यात मिसळणं
तसा जुना छंद असला 
तरी दरवेळी जोपासताना
हिरवेपण खुलत जातं माझ्यातलं
उलगडतात त्याच्या छटा माझ्यातून
अन गहिरं होतं आभाळ
काळ्याभोर ढगांनी
बरसत रहातात मग सरी
काळवेळ न बघता
माझ्या सोबत आत बाहेर
नवा पावसाळा ल्येउन
उलगडत जातात लडी
पावसाळी आठवांच्या
छत्रीत बंदिस्त होऊन
दरवर्षी न चुकता उघडण्यासाठी
पावलापाशी जमा झालेलं तळं
टिपतं माझा ओलेतं प्रतिबिंब                    
झिरपतं समुद्रा पर्यंत
पुढल्या पावसाची पूर्वतयारी म्हणून

------ वैभवी भिडे 
 
10 July 2014

No comments:

Post a Comment