Friday, December 30, 2011

अजुन एक वर्ष सरले


अजुन एक वर्ष सरले
जुने सारे आठवणीत उरले
बंद मुठीत नवे लपले

काही हरले काही जिंकले
कुणी रडले कुणी हसले
हिशोबात या काही गुंतले

कुणी गेले कोणाचे अडले
दुनियेत नव्या कुणी रमले
जगरीतीतुन या कुणी सुटले

नवे दालन खुले झाले
शब्द उमलले पुन्हा बहरले
जगण्याचे कारण मिळाले

धुळ झटकुनी साफ़ केले
रंगरंगोटीत दंगुन गेले
मनाचे कवाड पुन्हा उघडले

Tuesday, November 22, 2011

न रेंगाळणे त्या वळणावर आता


काय हरवले काय गवसले
व्यर्थ मांडणे हिशोब आता
वाहुन जाते सारे काही
न रेंगाळणे त्या वळणावर आता

फ़सवे हसु भावही खोटे
मुखवटे सारे टरकले आता
वाहुन जाते सारे काही
न रेंगाळणे त्या वळणावर आता

एक चुक अन शिक्षा अनेक
कोडगेपणच उरले आता
वाहुन जाते सारे काही
न रेंगाळणे त्या वळणावर आता

भावना थिजल्या शब्द कोरडे
बोलने केवळ निमित्त आता
वाहुन जाते सारे काही
न रेंगाळणे त्या वळणावर आता

कोण सांगतो कोण  लिहितो
वेगळेपण ना उरले आता
वाहुन जाते सारे काही
न रेंगाळणे त्या वळणावर आता

रेषा


जमल्या सार्‍या रेषा
बनवला एक नकाषा

उभ्या आडव्या गेल्या
चार कोनतुन फ़िरल्या

ना भलतीकडे वळल्या
ना कशातही गुंतल्या

पण तरी का दुभंगल्या
कुठल्या दिशा चालल्या

कोण खोडणार  ही निराशा
पुन्हा रेखाटणार नव्या रेषा??

Monday, October 3, 2011

कितीदा


कितीदा तुला आठवायचे
तारे नभातील मोजायचे

कितीदा तुला सांगायचे
अन नखांना कुरतडायचे

कितीदा तुला पहायचे
पापण्यांनी पुन्हा झाकायचे

कितीदा तुला समजायचे
शुन्यात हरवुन जायचे

कितीदा तुला ऐकायचे
एकच गाणे गुणगुणायचे

कितीदा तुला लिहायचे
खोडुन पाठ करायचे

कितीदा असेच चालायचे
कवितेतच तुला भेटायचे

कुठेतरी काहीतरी कुणीतरी


कुठेतरी तुटते
काहीतरी हरवते
कुणीतरी विखुरते

कुठेतरी हादरते
काहीतरी बिनसते
कुणीतरी कोसळते

कुठेतरी सलते
काहीतरी खुपते
कुणीतरी रडते

कुठेतरी समजते
काहीतरी उमगते
कुणीतरी सुटते

कुठेतरी जाणवते
काहीतरी लिहिते
कुणीतरी वाचते

कुठेतरी उजाडते
काहीतरी रुजते
कुणीतरी उमलते

Thursday, September 29, 2011

वेड


हा छंद म्हणु की नाद असे
शब्द उमटती तलम कसे

दिवस वेगळा ना रात्र असे
मग रंग भासती गहिरे कसे

ही विचारांची रांगोळी असे
नक्षीवर उमटती ठसे कसे

ठाऊक ना सार्यांस असे
कोडे हे सुटणार कसे

सारी अजब किमया असे
शहाणे बनती पिसे कसे

वेड हेच तर मर्म असे
नका विचारु लागते कसे

होतं असं कधी कधी


अस नेहमीच होत नाही
पण घडत कधी कधी

हसु येत रहातं
अश्रु आटले म्हणुन

जग फिरावस वाटतं
दुर पळायच म्हणुन

कातरवेळ सलु लागते
कोणी आठवत म्हणुन

रात्रभर जागे रहातो
पहाट व्हावी म्हणुन

एकच गाण गुणगुणतो
कोणी आवडल म्हणुन

जग परकं होतं
घर सुटलं म्हणुन

मी काहीबाही  लिहीते
सहज सुचलं म्हणुन

Saturday, September 17, 2011

प्रत्येकाचा मार्ग वेगळा



गुंता सुटला पाय मोकळा
प्रत्येकाचा मार्ग वेगळा


धावणेच जरी प्रिय कुणाला
चालणे हा धर्म आम्हाला


आसमंत अमुचा न्यारा
सोबतीला वादळवारा 


ना तमा ही वाट काटेरी
उमलवीत जातो फुलेच सारी


ठसा तुमचा जरी सोनेरी
मजवीण इतिहासाची पाने कोरी


मी न सांगते दुसरे काही
वाटाड्या अपुला वेगळा नाही

Monday, September 12, 2011

नको आठवूस मला


जेव्हा हरवेल काही 
ना सापडणार तुला
नको आठवूस मला

जेव्हा चुकशील वाटा
नसेल सोबत तुला
नको आठवूस मला


जेव्हा लिहीशील गाणी
अन चकवतील शब्द तुला
नको आठवूस मला

जेव्हा दुर धुक्यातुन
घालेल कोणी साद तुला
नको आठवूस मला

जेव्हा उगवतील तारे
दिसणार नाही चंद्र तुला
नको आठवूस मला

जेव्हा संपेल सारे काही
अल्बम व्याकुळ करेल तुला
नको आठवूस मला

जेव्हा उमलेल ध्रुवतारा
अन दिशा सापडेल तुला
नको आठवूस मला