Monday, October 3, 2011

कितीदा


कितीदा तुला आठवायचे
तारे नभातील मोजायचे

कितीदा तुला सांगायचे
अन नखांना कुरतडायचे

कितीदा तुला पहायचे
पापण्यांनी पुन्हा झाकायचे

कितीदा तुला समजायचे
शुन्यात हरवुन जायचे

कितीदा तुला ऐकायचे
एकच गाणे गुणगुणायचे

कितीदा तुला लिहायचे
खोडुन पाठ करायचे

कितीदा असेच चालायचे
कवितेतच तुला भेटायचे

कुठेतरी काहीतरी कुणीतरी


कुठेतरी तुटते
काहीतरी हरवते
कुणीतरी विखुरते

कुठेतरी हादरते
काहीतरी बिनसते
कुणीतरी कोसळते

कुठेतरी सलते
काहीतरी खुपते
कुणीतरी रडते

कुठेतरी समजते
काहीतरी उमगते
कुणीतरी सुटते

कुठेतरी जाणवते
काहीतरी लिहिते
कुणीतरी वाचते

कुठेतरी उजाडते
काहीतरी रुजते
कुणीतरी उमलते

Thursday, September 29, 2011

वेड


हा छंद म्हणु की नाद असे
शब्द उमटती तलम कसे

दिवस वेगळा ना रात्र असे
मग रंग भासती गहिरे कसे

ही विचारांची रांगोळी असे
नक्षीवर उमटती ठसे कसे

ठाऊक ना सार्यांस असे
कोडे हे सुटणार कसे

सारी अजब किमया असे
शहाणे बनती पिसे कसे

वेड हेच तर मर्म असे
नका विचारु लागते कसे

होतं असं कधी कधी


अस नेहमीच होत नाही
पण घडत कधी कधी

हसु येत रहातं
अश्रु आटले म्हणुन

जग फिरावस वाटतं
दुर पळायच म्हणुन

कातरवेळ सलु लागते
कोणी आठवत म्हणुन

रात्रभर जागे रहातो
पहाट व्हावी म्हणुन

एकच गाण गुणगुणतो
कोणी आवडल म्हणुन

जग परकं होतं
घर सुटलं म्हणुन

मी काहीबाही  लिहीते
सहज सुचलं म्हणुन

Saturday, September 17, 2011

प्रत्येकाचा मार्ग वेगळा



गुंता सुटला पाय मोकळा
प्रत्येकाचा मार्ग वेगळा


धावणेच जरी प्रिय कुणाला
चालणे हा धर्म आम्हाला


आसमंत अमुचा न्यारा
सोबतीला वादळवारा 


ना तमा ही वाट काटेरी
उमलवीत जातो फुलेच सारी


ठसा तुमचा जरी सोनेरी
मजवीण इतिहासाची पाने कोरी


मी न सांगते दुसरे काही
वाटाड्या अपुला वेगळा नाही

Monday, September 12, 2011

नको आठवूस मला


जेव्हा हरवेल काही 
ना सापडणार तुला
नको आठवूस मला

जेव्हा चुकशील वाटा
नसेल सोबत तुला
नको आठवूस मला


जेव्हा लिहीशील गाणी
अन चकवतील शब्द तुला
नको आठवूस मला

जेव्हा दुर धुक्यातुन
घालेल कोणी साद तुला
नको आठवूस मला

जेव्हा उगवतील तारे
दिसणार नाही चंद्र तुला
नको आठवूस मला

जेव्हा संपेल सारे काही
अल्बम व्याकुळ करेल तुला
नको आठवूस मला

जेव्हा उमलेल ध्रुवतारा
अन दिशा सापडेल तुला
नको आठवूस मला

पुन्हा एकदा तेच


पुन्हा एकदा तेच 
तेच गप्प रहाणे
तेच मान झुकवणे
डोळे गच्च मिटुन
सारे कढ पिणे

तेच शुन्यात हरवणे
तेच रात्र जागवणे
शब्द ओठी गिळुन
अबोलीगत उमलणे

तेच जोखड वहाणे
तेच धीमे चालणे
मुक्याचा मार सहत
पोळा साजरा करणे

तेच दिवस घालवणे
तेच कट्टे सजवणे
वेळ जात नाही म्हणून
उंबरठे झिजवणे

तेच पुन्हा वाचणे
तेच सारे लिहिणे
त्याच त्या शब्दांना
कविता म्हणुन मिरवणे

Thursday, August 25, 2011

भ्रमंती


कुठली माती कसली नाती
सारे आपुलेच गीत गाती

कितीही असोत हात हाती
काल प्रवाही ते निसटती

दिवस रात्र जाती येती
पाखरे नवे इमले बांधती

नवी घरटी नवे संगती
चार दिसांनी उडुन जाती

कशास चिंता का आठवती
दोन क्षणांचे सारे  सोबती

कुणास ठाउक कुठे निवारा
कुठे नेई हा प्रवास सारा

तरी चालणे नच विरामा
पुन्हा खेळ अन पुन्हा भ्रमंती

Wednesday, August 24, 2011

ख्वाहीशे





क्यूँ ना कहु अपने दिल कि बात?
क्यूँ रखु छुपाके हर जजबात?

क्या बदलेगा ऐसी खमोशीसे?
या होगा हर पल भरा खुशियोसे?

तो क्यूँ न कहु  सदियोसे  छुपे राज को?
आजाद करु अनकहे जमीर को?

क्यूँ चुनु रास्ता औरोका ?
क्यूँ  न  देखु नक्शा मेरे दिल का?

क्या मिलेगि मंज़िल ऐसे चलनेसे?
जो सजी होगि सिर्फ़ फ़ुलोसे?

तो क्यूँ ना चलु एक डगर नयी?
हरीभरी बेखबर पर मनचाही

क्यूँ लिखु जो है सबको पसंद?
मिठे अल्फाजोका बनाके गुलकंद?

क्या बदलेगा सच यु छुपानेसे?
या मिलेगि तस्सली ऐसे झूटसे?

तो क्यूँ न लिखु जो मुझे है बताना
एक कडवासा सच, नया अफ़साना?

क्यूँ उडु आसमाँ मे औरोके कंधेपे सवार
क्या ऐसे पोहच पाउंगी कभी उस पार?

तो क्यूँ न फ़हराउँ पंख अपने
जियूँ एक पंछी के सपने?