Friday, July 4, 2014

सगळ्यांनी पकडून ठेवलेत 
तेचतेच शब्द, अनुप्रास, अलंकार वगैरे वगैरे 
काळ बदललाय 
कोणीतरी सांगितलं पाहिजे त्यांना 
रुळलेला प्रवाह बदलणं 
प्रत्येक नदीसाठी जिकिरिचच 
पण वळलं पाहिजेच 
समुद्राला गाठायचं असेल तर 
तोही आता या तडाख्यात 
फार टिकणार नाही 
तेव्हा घाई करावीच लागेल 
चंद्र आताशा हाकेच्या अंतरावर येउन ठेपलाय 
तेव्हा ते कौतुकही संपलं 
नवीन ग्रह तुमच्या दृष्टी कक्षेच्या बाहेरच 
तेव्हा चांदण्यांच्या रंगरंगोटीवरच काम भागेल 
पावसाला तुम्ही डांबून ठेवलंय 
नाहीतर हे सगळं धुउन काढलं असतं 
दाखवलं असतं तुमच्या प्रतिभेचं रुतलेलं चाक 
तुमच्याच शब्दांच्या आरशातून 
अजून महाभारताचं रणशिंग फुंकलं नाहीये 
पण श्रीकृष्णजन्म झालाय 

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment