Friday, July 4, 2014

मी घोटीव गुळगुळीत नाही
काहीशी खडबडीत अन अणकुचीदार आहे 
जंगली मातीचे अवशेष 
अजून शिल्लक आहेत 
त्यातल्या मुळा खोडांच्या 
चिकटलेल्या तुकड्यांसहीत 
वाळलेला पाचोळा, सुकलेली फुलं 
यांचा अमीट रंग चढलेल्या अवस्थेत 
मी उभी आहे जमिनीवर मिरवत 
स्वतःचे दगडीपण 
पांथस्थांच्या ठोकरांकडे दुर्लक्ष करत 
आपल्याच ओबडधोबड मस्तीत 
गातेय माझी रांगडी गाणी 
रोज नव्या चालीत 
वाऱ्या सोबत आता सूर 
घुमू लागलेत दूर देशी 
लवकरच इथेही गर्दी होईल 
गाणारा दगड बघायला 
मग इथे काही उरलंच तर असेल 
माती 
तीही भाळी लावतील दैवी मानून 
पण इतर दगडांचं देवपण राहील उपेक्षित 
सालाबाद प्रमाणे 

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment