Tuesday, June 17, 2014

समुद्रात भरकटलेल्या जहाजाला
एखादं बेट सापडावं
तसेच पोहोचतात सारे
कवितांच्या प्रदेशात
फार भन्नाट असतात हे
कोरे करकरीत अनुभव

स्वागताला परिचित शब्द उभे दिसतात
वेस ओलांडली की ओळख होते
नव्यानेच जुन्या अर्थांशी

सापडत जातात नित्यनवी क्षितिजं
लेखणीच्या स्पर्शासाठी आसुसलेली
अचंभित नजरांनी आसपास बघावं
तर दिसतात आपल्याच सारखे कित्येकजण
वाट चुकलेले

चालता चालता अवचित गवसू शकतो
शब्दाजडीत महाल अर्थांनी लखलखणारा
एकएक अक्षर जणू कोहिनूर
कल्पनांच्या कोंदणात जडवलेला

भाषांची लयदार घोटीव शिल्पे
खुणावतात विचारांना
अन अलगद अडकतात अनुभव 
या कालप्रवाहात
पुन्हा पुन्हा जागृतीसाठी

संपता संपत नाही हा प्रदेश
निघता निघत नाही पाउलं
भागता भागात नाही तहान
अन सुरु रहातो अखंड यज्ञ
पिढ्यानपिढ्या
पंचतत्वात रुजलेला

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment