Tuesday, June 17, 2014

खूप खोलवर पुरून ठेवलंय मी प्रश्नांना 
कोणालाच दिसू नयेत म्हणून 
उगाच त्यांना उकरू नका 
तुमच्याच जगात उलथापालथ होईल     

स्वतःचं अस्तित्व प्रश्न म्हणून जगलेय 
मिळमिळीत उत्तरांनी समाधान कसं होईल ??

स्वयंप्रकाशित आहेत प्रश्न 
तुमच्या ग्रहावर दिवाळी करा 
त्यांचा उजेड उधार घेऊन 
प्रकाश वाटणं त्यांचा स्थायीभाव आहे  

त्यांचा वावर कायम  
नम्रतेच्या अंगणात 
तसे मनाने हळवे आहेत माझे प्रश्न 

तुमची उत्तरं आली शोधत 
म्हणून पडलेत आज बाहेर 
त्यांचा उद्धटपण ठेचायला 
आता ही त्सुनामी थांबणे नाही 
एकजूट आहे त्यांची आपसात 

पण मला ना एक विचारायचंय 
तुमच्या उत्तरांना पडलेल्या प्रश्नांचं तुम्ही काय करणार???

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment