Tuesday, June 17, 2014

कौतुक वाटतं मला तुझं 
इतकं सरळ मार्गी हिशोब करणं 
तुलाच फक्त कसं जमतं ?? 

इथे जो तो तुझं माझं 
करण्यात गुंतलेला 
अन तू मात्र 
स्वार्थपरायणात गुंतलेला 
वर्ण लिंग वय भेदांपलीकडे 

जेव्हा ज्याची वेळ येते 
त्याला तू सोबत नेतोस 
बाकी कोणाकडे ढुंकूनही न पहाता 
एकाग्रतेचा गुरु जणू 

कुठलं घडयाळ आहे रे तुझ्याकडे 
माणसाची अचूक वेळ दाखवणारं??

बरं इतकं करूनही 
तू सगळ्यांचा नावडताच 
अचूक नेम साधूनही 
तुझा सत्कार अपशब्दानीच 

तुझ्यावर अन्यायीपणाचा शिक्का  
जगाने बहुमताने मारलाय 
तुझ्या कर्तव्यनिष्ठतेकडे काणाडोळा करत 

पण मी खूप भारावून गेलेय 
अगदी सुरुवातीला तुझी चुणूक पाहीली ना तेव्हापासून 
अचानक शिरकाव केलेलास तू माझ्या आयुष्यात 
आणि मग घरचाच झालास 
येत राहिलास वरचेवर 

खरंतर मला फारसं कळत नाही 
आयुष्यं नावाच्या विषयातलं 
पण तरी तुझं सच्चेपण जाणवतं 
बाकी कोणी काहीही म्हणो 
मला मात्र तुझी बाजू पटलीये 

बाकी सविस्तर बोलूच 
आपली "प्रत्यक्ष" भेट होईल तेव्हा 

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment